राजकारण

रवी राणांना आता माफ केलं! विनाकारण तोंडात माराल, तर...; बच्चू कडूंचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु, बच्चू कडूंची नाराजी दुर झाली नसल्याचे दिसून येत होते. प्रहार संघटनेच्या मेळाव्यात 'मैं झुकेगा नही'चे पोस्टरही झळकले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी या मेळाव्यात आपली भूमिका मांडली असून पहिल्यांदा म्हणून माफी असे म्हणत रवी राणांना इशाराही दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, प्रहार काही आंडू-पांडूचा पक्ष नाही. आम्ही संख्येने कमी असलो तरी बाजी आहोत. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि कोणी गेलं तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंडात माराल, तर आम्ही तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. सत्तेची आम्हाला परवा नाही. मी २० वर्ष ३५० गुन्हे घेऊन प्रवास केला आहे. सत्ता गेली चुलीत, असे त्यांनी म्हंटले आहे.

राजकारण राजकारणासारखे करावे. तत्व तत्वासारखे पाळावे. उगाच गुवाहटीला गेलो नाही. निर्णय कडू असले तरी काम गोड असले पाहिजे. शिवरायांनी तलवार काढली तेव्हा तत्वांशी तडजोड केली नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

छोटे है लेकीन दिलदार आहे. कोणी येऊन काही म्हणावं एवढे आम्ही सोप्पे नाही. पहिल्यांदा केले म्हणून माफ आहे. नंतर केले तर सांगू. आम्ही गांधींना मानतो. पण, भगतसिंह डोक्यात आहे. अस्तित्वाचा विषय आहे. आता त्यांना माफ केलं पण पुढे सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी रवी राणांना दिला आहे.

तरीही काल रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. चूक मान्य करत तुम्ही मोठेपणा घेतला. तुम्ही दोन पावले मागे घेतली आम्ही चार पावले मागे घेऊ. विनाकारण उर्जा वाया घालवायची गरज नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्याबद्दल त्यांचे आभार. माझा अपमान झाला. पण सामन्यांचा होऊ देणार नाही, असे त्यांनी शेवटी म्हणत हा विषय संपला, असे घोषित केले.

दरम्यान, पुढील निवडणुकीत 10 आमदार निवडून आणणार असा निर्धारही त्यांनी यावेळी केला आहे.

काय आहे प्रकरण?

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधीचा व्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक होत थेट पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवली होती. व मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. अन्यथा एक तारखेला पिक्चर दाखवू, अशा शब्दात इशारा दिला होता. अखेर आता शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करत रवी राणा व बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पडला आहे. व बच्चू कडू यांनीही आज वाद संपल्याचे घोषित केले.

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई