राजकारण

‘बळी’ची लाच दिली म्हणून खंजीर खुपश्या लोकांना...; शिवसेनेचा हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे खासदार व आमदार गुवाहटीत कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आले. यावरुन शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते.

मिंधे गटाचे आमदार म्हणतात, ‘देवीच्या दर्शनावरून खिल्ली उडवाल तर तुमच्यावर कोप होईल. देवीचा नवस फेडायला आम्ही आलोय’, मात्र हे साफ खोटे आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी नवस वगैरे करण्याचा या लोकांना अधिकार नाही. आषाढी-कार्तिकेस पांडुरंगाची महापूजा घातली जातेच व तेव्हा देवाला साकडे घातले जाते. कामाख्या देवीची पूजा ही वैयक्तिक असू शकेल. मिंधे गटाचे एक आमदार योगेश कदम देवीचे नाव घेऊन धमकी देतात की, ‘कामाख्या देवी कोपली तर तुमची खैर नाही. कोप होईल कोप.’ अर्थात हे सर्व मिंधे गटानेच लक्षात घ्यायचे आहे. कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही, असे टीकास्त्र शिवसेनेने शिंदे गटावर सोडले आहे.

कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले. मिंधे गटापाशी आज कोणतेही पुण्य उरलेले नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची अखंड बदनामी सुरू आहे. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहेत. तेव्हा नवस बोलायचा तर तो या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकविण्यासाठी बोलायला हवा, पण त्याऐवजी या मंडळींनी नवस केला आहे आणि बळी दिलाय तो आपली सत्ता टिकविण्यासाठी. मग या मंडळींना देवीचा आशीर्वाद कसा मिळणार, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत. त्यामुळे कामाख्या देवीच्या नावाने भलते-सलते उद्योग करू नका. खोके सरकार व आता रेडय़ांचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात हा देवीचाच कोप म्हणायला हवा.

महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे. तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...