राजकारण

सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदेही बनतात; शिवसेनेचा निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना कुणाची हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. परंतु, दसरा मेळाव्या निमित्त शिवसेना व शिंदे गट आमने-सामने आले असून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच आज शिवसेनेने सामना रोखठोकमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात, असा निशाणा शिवसेनेने साधला आहे.

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला.

दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली, असा थेट आरोप शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

शिंदे आज शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करतात. आनंद दिघे यांचा हा सगळय़ात मोठा अपमान आहे. शिंदे हे खरंच हिमतीचे असतील तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी. ‘‘तुम्ही फुटा. न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून हवे ते निकाल मिळवून देतो’’, या दिल्लीतील महाशक्तीच्या आश्वासनानंतरच शिंदे व त्यांचे 40 मिंधे यांनी फुटण्याचे धाडस दाखवले. शिंदे यांच्या बरोबर जे ‘आमदार’ आहेत त्यातले किती खरे शिवसैनिक आहेत? या बनावट लोकांच्या पाठिंब्यावर ते माझीच शिवसेना खरी असा दावा करतात हे हास्यास्पद आहे. अब्दुल सत्तार, उदय सामंत, सरनाईक, शहाजी पाटील, तानाजी सावंत, शिवाय ‘ईडी’ पीडित इतर आमदार यांना कोणी शिवसैनिक म्हणायला धजावेल काय? अशा बाजारबुणग्यांनीच इतिहास काळात मराठा साम्राज्य लयास नेले.

कल्याण सिंगांना हिंदुहृदयसम्राट म्हटले हा बाळासाहेबांचा अपमान या चिडीतून दिघे यांनी संपूर्ण भाजपच अंगावर घेतला होता. शिंदे हे त्या दिघ्यांचे शिष्य शोभतील काय? आज ते शिवसेनेचा समांतर दसरा मेळावा घ्यायला निघालेत. चार हजार एसटी गाडय़ा गर्दी जमवण्यासाठी भाडय़ाने घेणार आहेत. पुन्हा इतर खर्च वेगळाच. कुठून येते ही आर्थिक ताकद? आनंद दिघे यांना हे उपद्व्याप कधीच करावे लागले नाहीत. त्यांना मोह नव्हता. त्यांची शिवसेना निष्ठा हे ढोंग नव्हते. ते खरेच मनाने व कर्तृत्वाने महान होते. दिघे धार्मिक होते… अघोरी नव्हते. दिघे वायफळ बोलत नव्हते. माणसे विकत घेऊन राजकारण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. दिघे कुणी तत्त्वज्ञ नव्हते. गरीब, अन्यायग्रस्तांना मदत करणारा ते मसिहा होते.

आनंद दिघे यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्हय़ाची जबाबदारी होती, पण त्यांच्या त्यागाची व निष्ठेची कवने संपूर्ण राज्यात गायली जात होती. दिघे माणसांना ‘पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत. शिंदे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात एक चटकदार वाक्य आहे ते असे, ‘‘राजकारणात सगळेच सारखे नसतात. काही आनंद दिघे असतात!’’ त्याच धर्तीवर आता सांगता येईल. सगळय़ांनाच दिघे बनता येत नाही. काही शिंदेही बनतात! शिंदे यांचा दसरा मेळावा म्हणजे चोरांचे संमेलन ठरेल! त्यात दिघ्यांचे नाव घेणे हा त्या पुण्यवान माणसाचा अपमान ठरेल! शिंदे व त्यांच्या लोकांनी अजूनही विचार करायला हवा. दसऱयाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र फुटला हे चित्र देशासमोर जाऊ नये. लोकभावना पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूनेच आहे; शिवसेना एकच आहे, असा पुर्नउच्चार शिवसेनेने केला आहे.

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

Sambhajinagar च्या पाणी प्रश्नावरून न्यायाधीश उतरले रस्त्यावर

Sanjay Raut: 'मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केलाय' मोदींच्या जिरेटोपावरुन राऊतांचा हल्लाबोल

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो