उत्तर गोलार्धात उन्हाळ्याचे आगमन सूचित करणारे समर सोलस्टाईस यंदा 21 जून 2025 रोजी आहे. या दिवशी वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र अनुभवली जाते. संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीचा झुकाव सूर्याच्या दिशेने सर्वाधिक असतो. त्यामुळे सूर्य कर्कवृत्तावर सर्वात उंच स्थितीत असतो. यंदा ही घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.12 वाजता घडेल.
भारत, अमेरिका आणि युरोपातील अनेक देश या दिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश अनुभवतील. उत्तर ध्रुवावर तर 24 तास सूर्यप्रकाश असतो. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या 365.25 दिवसांच्या प्रदक्षिणेमुळे संक्रांतीची तारीख दरवर्षी थोडी बदलते. अधिवर्ष (Leap Year) या फरकाची भरपाई करतो.
पृथ्वीचा 23.5 अंश झुकाव ही ऋतू बदलण्यामागील मुख्य कारण आहे. उन्हाळी संक्रांतीच्या दिवशी सूर्यकिरण उत्तर गोलार्धावर अधिक वेळ आणि थेट पडतात, त्यामुळे अधिक प्रकाशमान दिवस मिळतो.
दक्षिण गोलार्धात मात्र याच दिवशी सर्वांत लहान दिवस आणि मोठी रात्र असते. अंटार्क्टिक वृत्तातील काही भागांमध्ये सूर्य उगवतही नाही, याला "पोलर नाईट" म्हणतात.विज्ञानाबरोबरच ही घटना अनेक संस्कृतींमध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची मानली जाते. इंग्लंडमधील स्टोनहेंज येथे लोक सूर्योदय पाहण्यासाठी एकत्र येतात. भारतात याच काळात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो.
समर सोलस्टाईस (उन्हाळी संक्रांती) म्हणजे प्रकाश आणि ऊर्जा यांचा उत्सव. 22 जूनपासून दिवस हळूहळू लहान होऊ लागतात. तसेच निसर्गचक्राच्या सातत्याची जाणीव करून देतात.
हेही वाचा