Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना नेहमीच वेड लावलं आहे. तिच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी आली, परंतु 1993 मध्ये आलेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवतानाच मोठा वादही निर्माण केला होता.
सुभाष घई दिग्दर्शित ‘खलनायक’ या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत होते. फक्त चार कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण या यशामागे सर्वाधिक चर्चा झाली ती ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याची. अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेलं हे गाणं प्रदर्शित होताच देशभरात लोकप्रिय झालं, पण त्याचबरोबर त्यावर अश्लीलतेचे आरोप झाले.
गाण्याचे बोल महिलांचा अवमान करतात आणि अश्लील आहेत, असा आरोप करत काही समाजसंस्थांनी या गाण्याविरोधात आंदोलन छेडले. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाला हे गाणं चित्रपटातून हटवण्याची आणि विक्रीस गेलेल्या सर्व कॅसेट्स परत मागवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने गाण्यात कोणताही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे स्पष्ट करत तक्रार फेटाळून लावली.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही वाद सुरूच राहिल्याने त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी हस्तक्षेप केला आणि गाण्यात काहीही अश्लील नसल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांच्या भूमिकेनंतर निषेध थांबला आणि वाद शांत झाला. तथापि, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली होती. काही काळ या दोन्ही माध्यमांवर हे गाणं वाजवले गेलं नाही.
या वादग्रस्त गाण्याचा रिमेक 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ चित्रपटात करण्यात आला. करीना कपूर, तब्बू आणि कृती सॅनन यांच्या अभिनयासह सादर झालेल्या या नव्या आवृत्तीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वाद, बंदी आणि टीकेनंतरही ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि लक्षवेधी गाण्यांपैकी एक मानलं जातं.