इंदूरहून मेघालयात हनिमूनसाठी आलेल्या जोडप्याच्या बाबतीत एक मोठा खुलासा झाला आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडल्यानंतर एका आठवड्यानंतर, मेघालय पोलिसांनी त्यांची पत्नी सोनमला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
नक्की काय झालं ?
समोर आलेल्या माहितीनुसा, राजा आणि सोनम 22 मे रोजी मेघालयातील मावलाखियात गावात पोहोचले. त्यांनी एक स्कूटर भाड्याने घेतली आणि नंतर नोंगरियात गावाला भेट देण्यासाठी गेले, जिथे ते 'लिव्हिंग रूट ब्रिज' पाहण्यासाठी सुमारे 3000 पायऱ्या उतरले. दोघांनी 22 मे रोजी रात्री गावातील एका होमस्टेमध्ये घालवली आणि 23 मे रोजी सकाळी तेथून निघून गेले. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले.
2 जून रोजी राजाचा मृतदेह त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर एका खड्ड्यात आढळला. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने हा मृतदेह शोधण्यात आला. पोलिसांना शरण गेल्यानंतर मेघालय पोलिस डीजीपी आय. नोंगरांग यांनी सांगितले की, सोनम व्यतिरिक्त आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
'तो' युवक कोण ?
अशातच आता या या प्रकरणाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या हत्येचा संशय इंदोर येथील बाणगंगा परिसरात राहणाऱ्या एका युवकावर आहे. या व्यक्तीचे सोनमशी प्रेमसंबंध असल्याचे म्हंटले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनी सोनमने राजाला मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली. यासाठी शिलाँगमध्ये हनिमूनचे निमित्त करण्यात आले. तो तरुण स्वतः शिलाँगला गेला नाही, परंतु त्याने तीन शूटर पाठवले ज्यांनी तिथे जाऊन राजाला मारले.
पोलिसांकडून कॉल डिटेल्सचा तपास :
पोलिसांनी सोनमच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली तेव्हा ती त्या तरुणाच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. आरोपीने शिलाँगमध्येच शस्त्रे खरेदी केली होती. हत्येनंतर राजाचा टी-शर्ट, मोबाईल आणि शस्त्रे स्कूटरच्या ट्रंकमध्ये फेकून देण्यात आली. आता पोलिस इंदूरमधील त्या तरुणाचा शोध घेत आहेत ज्याने या हत्येचा कट रचला आणि मारेकऱ्यांना पाठवले. त्याच वेळी, तीन आरोपींना आधीच पकडण्यात आले आहे आणि गाजीपूरमध्ये सोनम पोलिसांना शरण गेली आहे.