थोडक्यात
नाशिकमध्ये अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन;
मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रमुख उपस्थितीने उद्घाटन
संत- महंत व अनेक मान्यवरांनी या सोहळ्याची शोभा वाढवली
नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर रोडवरील जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे शनिवारी (दि. २५) मोठ्या उत्साहात सुरू झाले. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री, संत- महंत व अनेक मान्यवरांनी या सोहळ्याची शोभा वाढवली.
शनिवारी सकाळी ८.३० वाजता पालखी सोहळा, ग्रंथदिंडी, ध्वजारोहण तसेच अधिवेशनीय सभागृह आणि ग्रंथनगरीचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान झालेल्या उद्घाटन सत्रात विविध संतगण आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने महंत मोहनराज कारंजेकर बाबा यांनी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला.
पहिल्या दिवसाचा समारोप सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणात झाला. रात्री ९ ते १० या वेळेत महानुभाव मराठी साहित्य आणि साहित्यिक विचारांवरील सत्र आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांना साहित्यिक परंपरेची “अमृततुल्य मेजवानी” अनुभवता आली रविवारी (दि. २६) सकाळी ७ वाजता भगवद्गीता पाठ पारायणाने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता समारोप सत्रात संतपूजन, प्रास्ताविक, तसेच मावळत्या अध्यक्षांचे विचार मांडले जातील. दुपारी ११.४५ वाजता धर्मसभा, आभार प्रदर्शन आणि निरोप समारंभ होणार आहे.
या संपूर्ण अधिवेशनात राज्यातील मंत्र्यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरोळे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाचे आयोजन महंत सुकेणकर बाबा महानुभाव, महंत चिरडे बाबा महानुभाव आणि कृष्णराज बाबा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. त्यांना माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, महानुभाव परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाशशेठ ननावरे, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे नाशिकमध्ये येऊन धर्म, अध्यात्म आणि संतपरंपरेच्या मूल्यांना ऊर्जा देणारे हे अधिवेशन भक्तांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरले आहे.