महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे 92 हजार अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता 1 कोटी रुपयांपर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण मिळणार आहे. हे विमा संरक्षण स्टेट बँक ऑफ इंडियामधील कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज (CSP) योजनेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल.
कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी गेल्या काही काळापासून अपघाती विमा योजनेची मागणी केली होती. त्यानुसार स्टेट बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर एसटी महामंडळाने बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. या योजनेअंतर्गत, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची विमा रक्कम दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा लाभ कर्मचाऱ्याच्या ड्युटीवर असण्याशी संबंधित नसेल,ड्युटीवर असो किंवा नसो, विमा लाभ त्यांना लागू होईल.
सामान्य मृत्यूच्या घटनांमध्ये 6 लाख रुपयांपर्यंत ग्रुप टर्म इन्शुरन्स मिळण्याची तरतूद आहे. तसेच, विमान प्रवासादरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास हवाई विम्याचा लाभही मिळेल. योजनेशी संबंधित अटी-शर्तींचे दस्तऐवजीकरण संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या केवळ स्टेट बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे इतर बँकांमधील खातेधारकांनीही स्टेट बँकेत खाते उघडण्याचा कल दर्शवला असून, याचा परिणाम एसटीने स्थापन केलेल्या सहकारी बँकेवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर एसटी संघटनेकडून राज्य शासनाकडे सहकारी बँकेला आर्थिक पाठबळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.या योजनेमुळे आतापर्यंत अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या केवळ एक लाख रुपयांच्या मदतीच्या तुलनेत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.