पुणे देशातील रोजगाराचे ‘हॉटस्पॉट’; एमबीए धारकांसाठी सर्वाधिक संधी महाराष्ट्रात; केरळमध्ये सर्वाधिक पगार, आंध्र प्रदेश महिलांची पसंती
देशभरातील तरुणांच्या रोजगाराच्या संधींबाबत अत्यंत महत्त्वाचा असलेला‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५’ नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यातून एक सकारात्मक आणि गौरवाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रने ८४% रोजगार क्षमतेसह देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला असून, रोजगार देण्याच्या बाबतीत हे राज्य देशातील अव्वल ठिकाण ठरले आहे. ही बाब राज्याच्या औद्योगिक वाढीची, तंत्रज्ञान क्षेत्रातील विस्ताराची आणि शिक्षण सुविधांच्या मजबुतीची साक्ष देणारी ठरते.
अहवालानुसार, पुणे हे शहर सर्वाधिक रोजगार संधी देणारे शहर ठरले आहे. आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा, ऑटोमोटिव्ह आणि स्टार्टअप इकोसिस्टम यामुळे पुणे हे देशातील युवकांसाठी रोजगाराचे आकर्षण बनले आहे.
इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५ : रोजगार क्षमतेनुसार टॉप राज्ये
महाराष्ट्र - ८४%
दिल्ली - ७८%
कर्नाटक - ७५
आंध्र प्रदेश - ७२%
केरळ - ७१%
उत्तर प्रदेश - ७०%
तामिळनाडू - ६४%
गुजरात - ६२ %
रिपोर्टनुसार, एमबीए पदवीधारकांसाठी सर्वाधिक संधी महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. याशिवाय इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, आणि डेटा अॅनालिटिक्स या क्षेत्रांत देखील भरपूर रोजगार आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे महिलांची कामासाठी राज्य निवड. आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांना महिलांची विशेष पसंती आहे. तथापि, महाराष्ट्र महिला रोजगाराच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये नाही, ही बाब राज्यासाठी चिंताजनक विषय आहे.
पुरुषांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र एक लोकप्रिय गंतव्य आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा यासोबतच महाराष्ट्रही त्यांच्या पसंतीचा भाग ठरतो. इंग्रजी भाषेचे सर्वाधिक प्रभुत्व महाराष्ट्रात: ६७.४५% लोक इंग्रजी भाषा बोलतात. टिकल थिंकिंग कौशल्य: महाराष्ट्रात ३४% तरुणांमध्ये हे कौशल्य आढळते. संगणक कौशल्यांमध्ये तिसरा क्रमांक: डिजिटल इंडिया मोहिमेला बळ देणारे हे कौशल्य महाराष्ट्रातील युवांमध्ये आढळते.
कोठे किती पगार?
८० हजार पगार देणारी राज्ये: केरळ,आंध्र प्रदेश,गुजरात,महाराष्ट्र,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,राजस्थान,उत्तर प्रदेश,कर्नाटक
३०-४० हजार पगार देणारी राज्ये: गुजरात,आंध्र प्रदेश,केरळ,महाराष्ट्र,तामिळनाडू,राजस्थान, प.बंगाल,कर्नाटक,उत्तर प्रदेश
महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांनी आपली औद्योगिक विविधता, पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाच्या आधारे रोजगार निर्माणामध्ये पुढाकार घेतला आहे. इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५ च्या निष्कर्षांवरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र रोजगार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि इंग्रजी कौशल्यांमध्ये देशाच्या अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. मात्र, महिलांना अधिक रोजगार संधी निर्माण करणे, हा राज्य शासनासाठी पुढील टप्प्यातील महत्त्वाचा उद्दिष्ट ठरावा.