राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील अर्थविषयक अनेक संकल्प मांडण्यात आले. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी नाराजी दर्शवली आहे अर्थसंकल्प झाल्यानंतर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसत आंदोलन केले. तसेच हा अर्थसंकल्प बोगस असल्याची टीकादेखील अनेकांनी केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी रोहित पवार म्हणाले की, "अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा फक्त कविता आणि भावनांचा खेळ आहे. यामध्ये केवळ आकडे सांगण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पामुळे सामान्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेवर काही चर्चा होणार किंवा काही निर्णय घेतला जाणार याबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. मात्र असे काहीच झाले नाही".
लाडक्या बहीणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये न केल्याने लाडक्या बहीणींच्या पदरी निराशा पडली. 'लाडकी बहीण' योजनेसाठी 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. पण लाडक्या बहीणींना 2100 रुपये मिळणार की नाही? याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले नाही.