मुख्यमंत्र्यांसह भाजपमध्ये- 21, शिंदेसेनेमध्ये- 12, अजित पवार गटात- 10 मंत्रिपदे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये बहुतांश खाती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारप्रमाणे त्या-त्या पक्षांकडेच राहतील, अशी दाट शक्यता वर्तावली आहे. सामान्य प्रशासन हे खाते नेहमीच मुख्यमंत्र्यांकडे असते. यावेळीही ते फडणवीस यांच्याकडे असेल. शिंदे सरकारमध्ये असताना सामान्य प्रशासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात आडकाठी ठरलेले विषय म्हणजे नगरविकास खाते ते कोणाकडे जाणार या चर्चांना उधाण आलं असताना ते शिंदे यांच्याकडेच राहील, अशी नवीन शक्यता निर्माण झाली आहे. कारण, ते स्वतः मुख्यमंत्री असताना नगरविकास खाते त्यांच्याकडेच होते.
भाजपकडे कोणती खाती?
गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास, पर्यटन, वने, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय, ही खाती भाजपकडे असतील अशी शक्यता आहे.
शिंदेसेनेकडे कोणती खाती?
नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण ही खाती शिंदेसेनेकडे राहतील. तसेच गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जलसंपदा, यांचापैकी एक महत्त्वाचे खाते आम्हाला द्या, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेने केली आहे. विधान परिषदेचे नेतेपद आणि सभापतिपद शिंदेसेनेला दिले जाईल, अशी दाट शक्यता वर्तावली आहे.
अजित पवार गटाकडे कोणती खाती?
वित्त, सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषधी प्रशासन, क्रीडा व युवक कल्याण, मदत व पुनर्वसन, ही खाती अजित पवार गटाकडे राहण्याची शक्यता आहे.