मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या वतीने आयोजित वानखेडे मैदानावरील स्टॅन्डच्या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शतकोत्तर वाटचालीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रस्ताव मांडला की, "एमसीएने जर एक लाख क्षमतेच्या भव्य क्रिकेट स्टेडियमसाठी प्रस्ताव दिला, तर त्यासाठी लागणारी जागा शासन उपलब्ध करून देईल आणि शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल."
फडणवीस म्हणाले, "वानखेडे हे क्रिकेटचे पवित्र स्थळ आहे. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर याचा पुतळा इथे आहे, त्यामुळे लॉर्डस नव्हे तर वानखेडेलाच खऱ्या अर्थाने क्रिकेटची पंढरी म्हणता येईल. आज मैदानावरील स्टॅन्डना देशाचा गौरव वाढवणाऱ्या महान व्यक्तींची नावे दिली जात आहेत, याचा अभिमान आहे."
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याचे नाव खेळत असतानाच स्टॅन्डला देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. अजित वाडेकर यांनी 1971 मध्ये भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला. त्यांच्या नावाचा स्टॅन्ड हेही अभिमानाचे आहे. तर शरद पवार यांनी प्रशासक म्हणून भारतीय क्रिकेटच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांचे नाव स्टॅन्डला देणे योग्यच आहे."
रोहित शर्मा म्हणाला, "आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. देशासाठी खेळताना मिळालेला हा गौरव मी आयुष्यभर जपेन. माझ्या नावाचा स्टॅन्ड वानखेडेसारख्या ऐतिहासिक मैदानात असणे, हे मी मोठ्या सन्मानाने स्वीकारतो." शरद पवार यांनी आपल्या भाषणात वानखेडे मैदानाच्या स्थापनेतील आपल्या योगदानाचा उल्लेख करत एमसीएचे आभार मानले. "मुंबई क्रिकेट असोसिएशनने कायम क्रिकेटमधील दिग्गजांचा सन्मान केला आहे. रोहित शर्माच्या नावाचा स्टॅन्ड हा त्याच्या कर्तृत्वाची आठवण ठेवणारा निर्णय आहे," असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि विविध क्लब्सचे पदाधिकारी, सचिव व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.