मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) एमसीएच्या (MCA) वतीने चार नव्या जागांचे उद्घाटन आज, शुक्रवारी करण्यात आले. वानखेडे स्टेडियममधील शरद पवार (Sharad Pawar) स्टँडच्या उद्घाटनवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) चे प्रमुख शरद पवार, भारतीय एकदिवसीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (captain Rohit Sharma) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) माजी एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एमसीए ऑफिस लाउंज, वानखेडे येथे शरद पवार स्टँड, रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड या चार नवीन जागांचे औपचारिक उद्घाटन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा स्टॅण्डचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहित शर्मा यांचे आई-वडिल आणि पत्नीदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "आज जे होणार आहे, त्याचे मी कधीही स्वप्न पाहिले नव्हते. लहानपणी मला मुंबईसाठी, भारतासाठी खेळायचे होते. कोणीही याचा विचार करत नाही. खेळातील महान खेळाडूंमध्ये माझे नाव असावे. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे देखील विशेष आहे, कारण मी अजूनही खेळत आहे. मी दोन फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे, पण मी अजूनही एक फॉरमॅट खेळत आहे."