Maharashtra election Dr Mohan Agashe on todays political situation of india : महाराष्ट्रात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत तब्बल 15,931 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, 2,869 जागांसाठी ही लढत सुरू आहे. राज्यभरातील 3 कोटी 48 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असून, सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटीही मतदानासाठी पुढे आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि विचारवंत मोहन आगाशे यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खोल आणि अस्वस्थ करणारे भाष्य करणारी ठरली आहे.
प्रभात रोडवर मतदान, पण भावना ‘शून्य’
मोहन आगाशे यांनी पुण्यातील प्रभात रोडवरील विमलाबाई गरवारे शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले,
“मतदान केल्यानंतर मी भावना शून्य झाल्यासारखं वाटतंय…”
ही प्रतिक्रिया केवळ वैयक्तिक भावना नसून, आजच्या राजकारणाविषयीची एक गंभीर टिप्पणी असल्याचे जाणवले.
‘पूर्वीचं आणि आताचं राजकारण वेगळं’
आगाशे यांनी पूर्वीच्या आणि सध्याच्या राजकीय वातावरणातील फरक अधोरेखित करत सांगितले की,
“सुरुवातीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप मोठा फरक पडलेला आहे. कोण कुठे आहे, नेमकं कोण कोणाच्या बाजूला आहे, हेच समजत नाही.”
एकदिलाने काम करण्याच्या घोषणा दिल्या जात असल्या, तरी त्या प्रत्यक्षात उतरतील की नाही, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली.
‘रिसोर्सेस आणि लोकसंख्येवर कोणी बोलत नाही’
राज्य आणि देशापुढील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधत आगाशे म्हणाले,
“आपल्याकडे असलेली संसाधनं आणि प्रचंड लोकसंख्या… यावर फारसं कुणी बोलताना दिसत नाही. लोक जोपर्यंत सजग होत नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारेल असं वाटत नाही.”
यावेळी त्यांनी एक गंभीर इशाराही दिला,
“आकाश फाटलं तरी कुणाकडे हात मारायचा, अशी परिस्थिती उद्या आपली होऊ शकते.”
‘प्रोफेशनली प्रामाणिक राहणं महत्त्वाचं’
राजकारणासोबतच सामाजिक जबाबदारीवर भाष्य करताना मोहन आगाशे म्हणाले की,
“आपण आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणं फार महत्त्वाचं आहे. पूर्वी देशाप्रती निष्ठा, लोकांसाठी काहीही अपेक्षा न ठेवता काम करणं, याला वेगळं महत्त्व होतं.”
आजची राजकीय स्थिती काय आहे, हे सांगण्यापेक्षा पत्रकार आणि नागरिकांनी स्वतः अनुभव घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सत्ता उलथवण्याचीच मानसिकता’
सध्याच्या राजकारणावर थेट भाष्य करताना आगाशे म्हणाले,
“हे आले की त्यांना कसं पाडायचं आणि ते आले की यांना कसं उलथवून टाकायचं,हेच सध्या सुरू आहे. वरवर एकमेकांना चांगलं म्हणणंही उरलेलं नाही.”
पूर्वी मतभेद असले, तरी शांतपणे चर्चा आणि युक्तिवाद होत असत, अशी आठवण त्यांनी करून दिली.
मतदारांना थेट आवाहन
आपल्या वक्तव्याचा शेवट करताना मोहन आगाशे यांनी मतदारांना थेट आणि ठाम संदेश दिला,
“डोळे आणि कान उघडे ठेवा… पण तोंड बंद ठेवा. जे दिसतंय, जे ऐकू येतंय, ते नीट पहा-ऐका. आणि आतून जे योग्य वाटतं, ते करा.”
त्यांचे हे शब्द सध्याच्या राजकीय गोंधळात मतदारांसाठी मार्गदर्शक ठरणारे असल्याचे अनेकांनी नमूद केले.