(New Guidelines For Teachers and Principals ) राज्यातील शाळांमध्ये मुलांना सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांसाठी कडक मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. विद्यार्थ्यांवर होणारी मारहाण, मानसिक त्रास किंवा कोणत्याही प्रकारचा अन्याय यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांचे हक्क जपण्यासाठी आणि शाळांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी घेण्यात आला आहे.
या नव्या नियमांमुळे राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांशी आदराने, समजून आणि संवेदनशीलपणे वागणे आवश्यक ठरणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदींवर पुन्हा एकदा ठाम भर देण्यात आला आहे. विशेषतः कलम 17 नुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे, मारहाण करणे, मानसिक दबाव टाकणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे हे पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाला किंवा कर्मचाऱ्याला मुलांना शिक्षा देण्याचा अधिकार राहणार नाही.
याशिवाय विद्यार्थ्यांना नावं ठेवणे, टोमणे मारणे, शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल असे वर्तन करणेही कठोरपणे निषिद्ध आहे. तसेच अभ्यासातील कामगिरी, जात, धर्म, लिंग, भाषा, अपंगत्व किंवा आर्थिक परिस्थिती यावरून जर कुठलाही भेदभाव केला, तर तो गंभीर गुन्हा मानला जाणार आहे.
हे सर्व नियम कायमस्वरूपी, तात्पुरते तसेच कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सर्व शालेय कर्मचाऱ्यांना लागू असतील. या निर्णयामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि पोषक वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.