देशाच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
धनखडांच्या राजीनाम्यानंतरचा घडामोडींचा वेग
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अनपेक्षितपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार, याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगू लागली. दिल्लीच्या सत्ताकेंद्रात घडामोडींना वेग आला आणि अखेर भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.
मोदी–नड्डा यांच्याकडे निवडीचा अधिकार
एनडीएच्या घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार सोपवला होता. त्यांच्या शिफारशीवर आज दिल्लीत झालेल्या बैठकीत सी.पी. राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करण्यात आलं. एनडीएतील संख्याबळ पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
राधाकृष्णन हे तीन दशकांपासून भाजपाशी निगडित असून त्यांचा राजकीय प्रवास सातत्याने संघटनात्मक आणि संसदीय भूमिकांशी जोडलेला राहिला आहे. तमिळनाडूतील कोयंबतूर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली, मात्र मोदींच्या लाटेतदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला. तरीसुद्धा पक्षाशी निष्ठावान राहून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं.
राज्यपालपदापासून उपराष्ट्रपतीपदापर्यंत
18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. फक्त दीड वर्षातच त्यांना महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याची राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. आता उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा राजकीय प्रवास एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.