राज्यातील कुपोषणाची समस्या गंभीर आहे. राज्यात अनेक बालके अजूनही कुपोषित आहेत आणि काही कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभागाच्या पाहणीनुसार, राज्यातील कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आहे. आणि ही राज्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे.
महाराष्ट्र राज्यात विविध आजारांबरोबरच कुपोषणामधेही जास्त वाढ होताना दिसत आहे. कुपोषित बालकांचा आकडा हा मोठा असून विशेष म्हणजे शहरी भागात त्याची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातील बालकांनाही कुपोषणाने ग्रासले असल्याचे उघड झाले आहे.याबाबतची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
कुपोषणाची अनेक कारणे आहेत जसे की गरिबी, अस्वच्छता, अपुरा आहार, आणि आरोग्य सुविधांचा अभाव यासारख्या कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात तीव्र कुपोषित ३०,८०० बालके आढळली आहेत. शहरी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले असून मुंबई आणि उपनगरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मात्र ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या त्यामानाने खूप कमी आहे.
कुपोषणाचे बालकांच्या वाढीवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने यावर लक्ष देऊन कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यावर आणि जास्तीत जास्त मुलांना पोषक आहार देण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. कुपोषण कमी करण्यासाठी, राष्ट्रीय पोषण अभियान आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना अश्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत मात्र राज्यामध्ये विविध योजना राबवल्या जात असल्या तरी कुपोषणाचे प्रमाण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.