देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यात 2,650 एमबीबीएस जागांची वाढ जाहीर केल्यानंतर आता समितीने आणखी 2,300 नव्या जागांना मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 150 जागांचा समावेश असून, या वाढीमुळे तिसऱ्या फेरीसाठी एकूण 4,950 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
देशात रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि जागा वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) दरवर्षी किमान 15 हजार नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार, नवीन महाविद्यालयांना मान्यता देतानाच कार्यरत महाविद्यालयांमध्येही जागावाढ केली जात आहे.
MCC ने 10 ऑक्टोबर रोजी देशभरात 2,650 जागा वाढविल्याची घोषणा केली होती, त्यानंतर 17 ऑक्टोबरला आणखी 2,300 जागा वाढविल्या. त्यामुळे देशभरातील एमबीबीएसच्या जागांची एकूण संख्या आता 1,29,025 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात पनवेलमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयात 100, तर मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये 50 नवीन जागांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात 100 आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात 50 जागांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे तिसऱ्या फेरीत राज्यातील विद्यार्थ्यांना एकूण 300 नवीन जागांचा फायदा मिळणार आहे.
दरम्यान, NMC ने गेल्या वर्षभरात 41 नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्याने देशातील सरकारी वैद्यकीय संस्थांची संख्या 816 झाली आहे. या नव्या निर्णयामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळणार असून, देशातील आरोग्यसेवा क्षेत्राला याचा थेट लाभ होईल.