राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दलची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाची सेवा करताना नाशिकमधील वरणगाव येथील अर्जुन बावीस्कर यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन पोहोचले होते. दरम्यान याचवेळी गिरीश महाजन यांच्या डोक्याला रॉड लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅकमध्ये चढले असताना ट्रॅकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. मात्र रक्तस्राव होत असतानाही गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
नंतर लगेचच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. उपचार केल्यानंतर नाशिक येथे महत्वाची बैठक असल्याने जावे लागणार आहे, असे सांगून त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.