आज दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरासह विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणीच पाणी झाले आहे. त्यातच अंधेरीच्या सबवे परिसरात तीन ते चार फूट पाणी भरल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तूर्तास बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या दीड तासापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. रस्त्यांवर पाणी साचले आहे, रेल्वे सेवा उशिराने सुरू आहे आणि वाहतूक संथ गतीने पुढे सरकत आहे.मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढला असून अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल काहीशी उशिराने सुरु आहे.
मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यासोबतच ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहे. या जोरदार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही पाहायला मिळत आहे. पावसामुळे विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास रस्ते,रेल्वे आणि हवाई वाहतूक व्यवस्थेवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत असून पुढील 2 ते 3 तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.