थोडक्यात
सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य श्रेणीचे डबे असून प्रवाशांना सर्व प्रकारच्या आसन व्यवस्थेची सुविधा मिळणार आहे.
Mumbai To Nanded Special Trains in Festival : सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमुळे मराठवाडा आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असून सणासुदीच्या गर्दीत मोठा दिलासा मिळणार आहे.
या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य श्रेणीचे डबे असून प्रवाशांना सर्व प्रकारच्या आसन व्यवस्थेची सुविधा मिळणार आहे. गाडी क्रमांक 07604 ही गाडी 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून संध्याकाळी 16.35 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 06.30 वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07603 ही गाडी 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान दर सोमवारी हुजूर साहेब नांदेड येथून रात्री 23.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13.40 वाजता मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाड्यांची रचना देखील प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे. यात एक वातानुकूलित प्रथम, दोन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, दोन जनरेटर कार आणि एक पॅन्ट्री कार असे डबे असतील. याशिवाय या गाड्या ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा या स्थानकांवर थांबणार आहेत.
विशेष गाडी क्रमांक 07604 साठी आरक्षणाची सुविधा 20 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध होणार असून प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करू शकतात. आरक्षित नसलेल्या डब्यांसाठीची तिकिटे यूटीएस (UTS) अॅपद्वारे मिळू शकतील. या विशेष गाड्यांचे भाडे सुपरफास्ट मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच आकारले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात वाढलेल्या गर्दीत मुंबई आणि नांदेडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.