सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले. काल सकाळी सहा वाजल्याच्या त्यांच्या घरात आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. काल सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांची चौकशी सुरु झाल्यानंतर संजीवराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील जमली. मात्र कार्यकर्त्यांनी घरासमोर जास्त थांबू नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथी लक्ष्मी नगर येथील निवासस्थानी आयकर विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती घेतली गेली. घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल काढून घेतले तसेच घरातील लँडलाईनदेखील बंद केला. त्यानंतर घराबाहेर कडेकोड बंदोबस्तदेखील करण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे संजीवराजे नाईक निंबाळकर हे चुलत बंधू आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या या छाप्याच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पहिल्या दिवशी रात्री उशिरा १२ वाजल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी तपासणी करुन घराबाहेर पडले.
आज सलग दुसऱ्या दिवशी संजीवराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. विविध ठिकाणच्या आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान कोणती माहिती समोर येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर पडलेला छापा हा खूप दुर्दैवी असल्याचे रघुनाथ राजे निंबाळकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले आहे.
संजीवराजे निंबाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्याआधीच त्यांच्या घरावर छापा मारण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.