सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. तसेच अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सूचक वक्तव्यही केली जात आहेत. काल मनसे नेते संदीप देशपांडेंनी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावं असं म्हंटलं आणि त्यानंतर अवघ्या तासाभरात उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंसोबत युतीवर मोठं वक्तव्य केलं. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
अशातच आता आजच्या 'सामना' या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला. हा फोटो बऱ्याच कालावधीनंतर समोर आला. त्यामुळे आता नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच हा फोटो छापत "उद्धव ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही...बातमीच देतो...महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले...सूर जुळणार! उत्सुकता वाढली, असंही म्हटलं आहे.