भाजप नेते नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. धाराशीवमध्ये भाजपाच्या मेळाव्यात राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. यावेळी नितेश नितेश राणे म्हणाले, "सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, "कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत." नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे.
नितेश यांच्यावर टीका होत असतानाच त्यांचे बंधु नीलेश राणे यांनीदेखील जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, "नितेशने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही". दरम्यन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.