ताज्या बातम्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, शिवसेनेत इनकमिंगचा जोर

काँग्रेसच्या अस्वस्थतेत शिवसेनेचा आत्मविश्वास, 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

Published by : Shamal Sawant

पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय उलथापालथीचा कालावधी सुरू झाला असून, कोल्हापुरात ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा एकदा कार्यान्वित झाल्याच्या चर्चा सध्या तापल्या आहेत. एकीकडे विविध पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत असताना, दुसरीकडे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सांगलीत सुरूवात, कोल्हापुरात हालचाल!

सांगली जिल्ह्यात चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक पक्षांचे पदाधिकारी शिंदे गटातील शिवसेनेत सामील झाले. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातही काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख आणि त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यामुळे कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सतीश पाटील यांचा दावा! “जनता आमच्यासोबत आहे”

या घडामोडींवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जनता आमच्यासोबत आहे. कोणतेही 'ऑपरेशन' यशस्वी होणार नाही.” त्यांनी राजकीय घडामोडींसंबंधी साशंकता व्यक्त करत विरोधकांच्या प्रयत्नांना थेट आव्हान दिलं आहे.

शिवसेनेचा दावा! "हे ऑपरेशन नाही, लाट आहे!"

दरम्यान, शिवसेनेचे नेते आमदार राजेश शिरसागर आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे 'ऑपरेशन टायगर' नसून जनतेत निर्माण झालेली विश्वासाची लाट आहे. “शिवसेनेचं संघटन संपूर्ण राज्यभर वाढत आहे. कोल्हापुरात आणि सांगलीतही आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. हे यश एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीमुळे आहे,” असं शिरसागर यांनी स्पष्ट केलं.

मंत्री उदय सामंत लोकशाही मराठी सोबत बोलताना म्हणाले की, इतर पक्षातील नेत्यांना वाटतं की हे नेतृत्व स्वीकारावे. या राजकीय हलचालींवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “कोल्हापुरात आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेत मोठे इनकमिंग होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे अनेक नेते, माजी मंत्री आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हे 'ऑपरेशन' नव्हे तर विकासाच्या मार्गावर चाललेली लोकांची साथ आहे.”

महायुतीचा आत्मविश्वास वाढतोय

कोल्हापूर जिल्ह्यात याआधीच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने संपूर्ण काँग्रेसला साफ केलं होतं. जिल्ह्यातील बरेच आमदार हे महायुतीकडून निवडून आले. याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुतीचा भगवा फडकवण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. शिवसेना, भाजप आणि अन्य घटक पक्षांनी आपापसात समन्वय साधत निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे.

'ऑपरेशन टायगर' की संघटन विस्तार?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठी राजकीय उलथापालथ घडली होती. यावेळी अनेक आमदारांनी शिवसेनेत प्रवेश करून सत्ता बदल घडवून आणली होती. यालाच 'ऑपरेशन टायगर' असं नाव दिलं गेलं.आता त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा संघटन विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याला 'ऑपरेशन टायगर रीलोडेड' म्हटलं जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची धडाकेबाज तयारी

सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. आमदार राजेश शिरसागर आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे यामध्ये विशेष पुढाकार घेत आहेत. अनेक महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्कात आहेत, अशी माहिती खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं असून, शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार इनकमिंग सुरू आहे. हे केवळ संघटन विस्तार की पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'चं नवं रूप ? याचा उलगडा येत्या काही दिवसांत होईल. मात्र हे निश्चित, की पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण नव्या समीकरणांच्या दिशेने जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...