येणाऱ्या 5 जुलैला मराठी भाषेसाठी होणाऱ्या मोर्चाला ऐतिहासिक वळण मिळण्याची शक्यता असून, या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र येणार आहेत.
महाजन म्हणाले की, “5 जुलैचा दिवस 'सोनियाचा दिन' ठरेल. मराठीसाठी सर्वजण एकत्र येताना दिसले, तर काहींना त्याचा ताण जाणवेल.” दोन्ही ठाकरेंनी जर मोर्चात एकत्र सहभाग घेतला, तर ते मराठी भाषेसाठी सकारात्मक वळण असेल, असंही त्यांनी नमूद केलं. ज्याचं हृदय मराठीसाठी धडधडतं, अशा प्रत्येक व्यक्तीचं मोर्चात स्वागतच आहे," असं महाजन म्हणाले.
राजकीय संभाव्य युतीबाबत विचारलं असता, महाजन यांनी थेट टिप्पणी टाळली. “मनसे-उबाठा युतीबाबत मी बोलणार नाही. परंतु मराठीसाठी एकत्र येणं ही मोठी गोष्ट आहे. युतीचा विचार पुढचं भवितव्य ठरवेल सध्या भाषेसाठी एकत्र येणं हेच महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
5 जुलैचा मोर्चा संपूर्णतः भाषेच्या मुद्द्यावर आधारित असून त्यात कोणताही राजकीय अजेंडा नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं. मराठी वाचली तर महाराष्ट्र वाचेल, आणि महाराष्ट्र वाचला तर देशही टिकेल,” हे त्यांचं मत ठाम आहे.
या मोर्चामुळे मराठी माणसाला नव्या प्रकारे आत्मविश्वास मिळेल, असं महाजन म्हणाले. “राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जेव्हा मोर्चा निघेल, तेव्हा रस्त्यावर चालणारा मराठी माणूस अधिक आत्मभानाने उभा राहील. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती होणार नाही, ही जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे,” असं त्यांनी सांगितलं. "भाषेच्या मुद्द्यावर का होईना, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ही गोष्ट मला भावते," असं सांगतानाच महाजन म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांना जर हे दृश्य दिसलं असतं, तर ते किती सुखावले असते, हे मी शब्दांत मांडू शकत नाही", असेही ते म्हणाले.