आज मुंबईत 'मराठी विजय दिना'निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. या ऐतिहासिक क्षणावर मराठी कलाकारांनी उत्स्फूर्त आणि भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “दोन भावांचा एकत्र येणं हा आनंद देणारा सोहळा आहे. ही गोष्ट फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, तर मराठी अस्मितेचा विजय आहे.” सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमासाठी खास हजेरी लावत म्हणाले, “मी साहेबांचे (राज आणि उद्धव) मनोगत ऐकण्यासाठी इथे आलो आहे. बघुयात, आता काय बोलतात!”
भरत जाधव यांनीही मनोगत व्यक्त करत म्हटलं, “आम्ही कलाकार म्हणून जे काही उभं राहिलोय ते फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी अद्याप आपल्याला तिच्यासाठी झगडावं लागतं, ही फार दुर्दैवी बाब आहे. आज राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, हे आमच्यासाठी आणि सगळ्या मराठी जनतेसाठी आनंदाचं कारण आहे.”
तेजस्विनी पंडित, ज्यांनी नेहमी मराठी भाषेच्या हक्कांसाठी सोशल मीडियावर ठामपणे भूमिका घेतली आहे, त्या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे मराठी युवतींचा आणि महिलांचा आवाज अधोरेखित झाला.
या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार, निर्माते, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘मराठी’ या समान धाग्याने सर्वांना जोडणारा आजचा दिवस, अनेकांच्या मते, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.