राज्यातील मराठी माणसाच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आम्ही आवाज उठवतोय. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा आहे," असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
आज आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. त्यांनी सांगितले की, "हा लढा मराठी भाषेसाठी आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, मराठी भाषा ही आमची ओळख आहे आणि त्यावर कोणीही गदा आणू शकत नाही."
राऊतांनी पुढे सांगितले की, "सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मराठी भाषेवर अन्याय होणार आहे. आम्ही त्या निर्णयाची आज होळी करणार आहोत. दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी एकत्र यावे, हा जनआंदोलनाचा पहिला टप्पा आहे."
5 जुलै रोजी होणाऱ्या भव्य मोर्च्याची माहिती देताना राऊत म्हणाले, "त्या दिवशी आम्ही एकत्रितपणे रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणू. मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे. हा फक्त अंदाजाचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे."
सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले, "या सरकारने राज्यात भाषिक आणीबाणी जाहीर केली आहे. विरोधकांना दडपण्याचे धोरण राबवले जात आहे. मिंधे गटाचे लोक बालबुद्धीचे आहेत आणि केवळ सक्तीमुळेच ते सत्ताधारी गटात सामील झाले."
"ही मराठी भाषेची चळवळ आहे. डांबराचा व्यवहार नाही. आमच्या मातृभाषेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. रावणराज्याला रामराज्याची तीव्र आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे," असे सांगत त्यांनी मराठी जनतेला भावनिक साद घातली. राऊत यांनी शेवटी सरकारला इशारा दिला की, "जर मोर्चा निघण्यापूर्वी सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला, तर आम्ही स्वागत करू. अन्यथा महाराष्ट्रात जनतेचा उद्रेक होणार हे सरकारने लक्षात घ्यावं."