"पैशांची एखादी बॅग देऊ... आजकल हमारा नाम बहुत चल रहा है," अशी मिश्कील शैलीत केलेली टिप्पणी सध्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबाबत चर्चेचा विषय बनली आहे. शासकीय रुग्णालयातील गरजांसाठी निधीची मागणी झाल्यानंतर त्यांनी हा उद्गार काढला. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली असली तरी सोशल आणि राजकीय वर्तुळात मात्र या विधानाची वेगवेगळी अर्थछटा अधोरेखित केली जात आहे.
शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर्करोग संस्थेत डिजिटल मॅमोग्राफी यंत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री शिरसाट बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रुग्णालयातील वॉर्ड, स्वच्छतागृह आणि इतर देखभाल व लहान बांधकामांसाठी आवश्यक निधीची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिरसाट म्हणाले, “पैशांसाठी काही अडले, असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकाल आमचं नाव खूप चालतंय. त्यामुळे पैशांची चिंता करू नका. एखादी बॅगच पाठवतो तुमच्याकडे.”
त्यांच्या या हलक्याफुलक्या भाष्याने क्षणभर वातावरण हलकं झालं, परंतु "बॅग" या शब्दाच्या राजकीय अर्थछटा लक्षात घेता, काही वर्तुळांमध्ये या विधानाची गंभीर दखल घेतली जात आहे. सार्वजनिक मंचावर निधीविषयीचा उल्लेख करताना अशा प्रकारची शब्दरचना टाळणे अपेक्षित असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाला इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सहसंचालक डॉ. शिल्पा दोमकुंडवार, अधिष्ठाता डॉ. सुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड आणि डॉ. अंजली वासडीकर यांची उपस्थिती होती.
शासकीय रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर सातत्याने बोट ठेवले जात असताना, मंत्री शिरसाट यांनी निधी देण्याची ग्वाही दिली, ही स्वागतार्ह बाब असली तरी, "बॅग" या शब्दाची निवड भविष्यात राजकीय फटक्याच ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अशा संवेदनशील विषयांवर जबाबदारीची जाण ठेवून भाष्य करणं, ही काळाची गरज आहे.