आज संपूर्ण महाराष्ट्रभर ठाकरे बंधूंचा मेळावा गाजला. मराठी भाषा सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र त्यानंतर सरकारने हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मागे घेतला. यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
मेळाव्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि सरकारमधील अनेकांवर निशाणा साधला. त्यानंतर लगेचच विरोधकांच्यादेखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अशातच आता शिवसेनेच्या अधिकृत X अकाऊंटवर विजयी मेळाव्याबद्दल उपहासात्मक टिप्पणी केली आहे.
शिवसेनेने विजयी मेळाव्याला लक्ष करत लिहिले की, "एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा , एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी , एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा , एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा, एकाचा स्वतंत्र सवतासुभा
दुसरा नुसताच आयतोबा!
मात्र अद्याप ठाकरे बंधूंकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यामुळे या पोस्टवर कोण काय प्रतिक्रिया देणार ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.