महाराष्ट्रामध्ये याची देही, याची डोळा! असा अविस्मरणीय सोहळा महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे. सरकारने महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचे अध्यादेश जारी केले. मात्र या अध्यादेशाच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला. या विरोधानंतर सरकारने अध्यादेश मागे घेतला. त्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विजयी मेळावा आयोजित केला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनी व्यासपीठावर दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
फडणवीसांवर निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज आणि मी बऱ्याच वर्षानंतर एकत्रित व्यासपीठावर आलो आहोत. सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
कोणी लिंबू कापतय, तर कोणी रेडा...
नंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज अनेक बुवा महाराज व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतय तर कोणी रेडा. माझ्या आजोबांनी भोंदूपणाच्या विरोधात लढा दिला होता. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.