ताज्या बातम्या

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह: उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष हल्ला

Published by : Team Lokshahi

"ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. तो महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे," अशा ठाम शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. 'सामना'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "जे पोकळ आहेत, त्यांना 'ठाकरे ब्रँड'ची गरज लागते." ही टीका करताना त्यांनी शिंदे गटाचा आणि भाजपचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ठाकरे ब्रँड पळवण्याचा केविलवाणा प्रयत्न

राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे’ या नावाचा दबदबा कायम राहावा यासाठीच काहीजण आजही त्या नावाच्या सावलीत स्वतःचं अस्तित्व शोधत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. "ज्यांच्याकडे स्वतःचं काही नाही, जे पोकळ आहेत, त्यांनी काही निर्माण केलं नाही, त्यांनी कुठलाही आदर्श उभा केला नाही, अशा लोकांना ‘ठाकरे ब्रँड’ची गरज लागते. ही त्यांची कमकुवतपणा दाखवणारी कबुलीच आहे," असं त्यांनी म्हटलं.

“काही बँड वाजत आहेत...” – उद्धव ठाकरेंचा उपरोधिक हल्ला

राज्यात शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थितीचा समाचार घेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक शब्दांत टोलाही लगावला. “काही बँड वाजत आहेत. आपल्याशिवाय देशात कोणतंही नाव नको आहे. स्वतःची तुलना देवाशी करत आहेत. अशा लोकांबद्दल काय बोलावं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याच मुद्द्यावर त्यांनी पुढे म्हटलं, "काळाच्या ओघात जे परंपरेला नाकारतात, त्यांना ती परंपराही नाकारते." हे वक्तव्य करताना त्यांनी भाजपसारख्या पक्षावर अप्रत्यक्ष निशाणा साधत, हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना चिमटा काढला.

“ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची ओळख”

"ठाकरे हे नुसते एक नाव नाही; ही मराठी माणसाची, महाराष्ट्राची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करणारे अनेक आले आणि गेले. पण जनतेनेच त्यांना पुसून टाकलं. आज माझ्याकडे सत्ता, यंत्रणा काहीच नाही, पण जनतेचं प्रेम आणि विश्वास माझ्याजवळ आहे," असं ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.

विधानभवनातही तणाव स्पष्ट

अवघ्या काही दिवसांपूर्वी विधानभवनात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उघडपणे ‘दुर्लक्ष’ केल्याची आठवण या पार्श्वभूमीवर नव्याने ताजी झाली आहे. ठाकरेंनी या संदर्भात थेट उल्लेख न करता पण स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांची वृत्ती उघडी पाडली.

ब्रँडची चोराचोरी आणि भक्तीचं नाटक

"भले १०० वर्षांची परंपरा सांगणारे असतील तरी त्यांनी जनतेला दिलं काय? काही नाही. मग तेच लोक ‘ठाकरे ब्रँड’ची चोराचोरी करत त्याचे भक्त असल्याचं दाखवतात, हा केविलवाणा प्रयत्न आहे. लोक अशा दिखाऊपणाला बळी पडणार नाहीत," असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा