केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाच्या घोषणादेखील केल्या आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी एसी लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल.
मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकलचे काम सुरु करण्यात आल्याचेदेखील वैष्णव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कल्याण ते बदलापुर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण- आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे वेगाने विस्तारण्यावर भर दिला जात आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्राकडून मिळणारा निधी महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला गती देईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात वेगाने रेल्वेचं जाळं तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी निधी देत आहेत, त्याचा फायदा होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.