राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर मोकळा झाला आहे. यानंतर राज्य सरकारने प्रभाग रचनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुणे महापालिकेची प्रभाग रचना नव्याने करण्यात येणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेची रचना 2017 प्रमाणेच कायम राहणार आहे. राज्यात हद्दवाढ झालेल्या नऊ महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये पुण्यासह इतर प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. दुसरीकडे, 17 महापालिकांमध्ये विद्यमान प्रभाग रचना कायम ठेवण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम ठरवला असून, त्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर केले जातील. महायुती सरकारने यंदाही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीतही हीच प्रणाली वापरण्यात आली होती. दरम्यान, हद्दवाढ झालेल्या आणि पूर्वी दोन सदस्यीय प्रभाग असलेल्या महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी, गटबाजी आणि प्रचाराचे नियोजन सुरू झाले आहे.