थोडक्यात
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबरला 75 वा वाढदिवस आहे.
यादिवशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एका मोठा उपक्रम जाहीर केला आहे.
यानिमित्ताने राज्यातील 75 बसस्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध करुन आहे.
Modi Mahotsav 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक मोठा उपक्रम जाहीर केला आहे. यानिमित्ताने राज्यातील प्रमुख 75 बसस्थानकांवर सर्वसामान्यांसाठी मोफत वाचनालय उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या वाचनालयांमध्ये मराठीतील नामवंत साहित्यिक, कवी आणि कादंबरीकारांची पुस्तके तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. नागरिक बसस्थानकावरील नोंदणी करून ही पुस्तके घर नेऊन वाचू शकतील आणि परत जमा करू शकतील. यासोबतच स्थानिक वृत्तपत्रांचाही दररोज समावेश करण्यात येणार आहे.
सरनाईक यांनी सांगितले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा प्रचार-प्रसार आणि वाचन संस्कृतीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत. त्यात ‘वाचन कट्टा’ या स्वरूपातील वाचनालय हा एक महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य जनतेला ज्ञानाची अनमोल भेट देण्याचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.