महाराष्ट्र शासनाने महिलांना सक्ष्मीकरणासाठी सुरु केलेली माझी लाडकी बहिण योजना अनेक मुद्द्यावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उपत्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अश्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरु झालेली होती. राज्य सरकार दरमहा प्रत्येक 1500 रुपये महिलांच्या खात्यात देत होते. आता राज्य सरकार योजनेत झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच या योजनेचा लाभ पुरुष घेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सरकार आता कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व लाभार्थ्यांची खात्रीशीर माहिती मागवण्यात आली आहे. ज्या महिलांनी किंवा इतरांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे सिद्ध होईल, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल आणि गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून हा प्रकार अत्यंत गंभीरपणे घेतला जात असून, भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे.