"महाराष्ट्राचा नाद खुळा" ही ओळ फक्त गाण्यापुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्षात महाराष्ट्राने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, तो देशाच्या आर्थिक प्रगतीचा खरा इंजिन आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवासी कार खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्राने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात तब्बल 4,68,975 कार विकल्या गेल्या. ज्यामुळे तो देशात सर्वाधिक कार खरेदी करणारा राज्य ठरला आहे. दक्षिण भारतात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ यांचाही मोठा वाटा आहे, तर उत्तर भारतात उत्तर प्रदेश आणि हरयाणा ही राज्ये झपाट्याने पुढे येताना दिसत आहेत. मात्र, एकट्या महाराष्ट्राने ही स्पर्धा चढवून देशात बाजी मारली आहे. हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर राज्यातील आर्थिक सुबत्ता, शहरीकरण आणि राहणीमानात झालेली वाढ याचं प्रतीक आहे.
रेपो रेटचा परिणाम
महाराष्ट्रात कार खरेदीत मोठी वाढ झाली असली तरी कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे रेपो रेट. कालचं रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर झालं असून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होऊ शकते. सध्या रेपो रेट 25 बेसिस पॉईंटच्या कपातीत आल्यामुळे रेपो रेट 6.50 टक्के आहे, आणि त्यामुळे कार लोनचे व्याजदरही त्या आधारावर निश्चित होतात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 8 लाखांची कार घेतली आणि 5 वर्षांसाठी लोन घेतलं, तर EMI सुमारे ₹15,600च्या आसपास येऊ शकतो. तथापि, बँकेनुसार व्याजदरात थोडाफार फरक असू शकतो. काही बँका सध्या 8.50 टक्के ते 11 टक्केपर्यंत कार लोन देत आहेत.
देशातील टॉप 5 राज्ये जिथे कार विक्री झाली सर्वाधिक:
1. महाराष्ट्र – 4,68,975
2. उत्तर प्रदेश – 4,43,862
3. गुजरात – 3,47,670
4. हरयाणा – 2,75,358
5. कर्नाटक – 2,74,322