Sanjay Rauat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून १६० जागा जिंकून देण्याची हमी दिल्याचा खळबळजनक दावा नुकताच केला. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा करत, त्याच व्यक्तींनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्याचा दावा केला आहे.
संजय राऊतांचा दावा: “EVM द्वारे ६५ अडचणीच्या जागा जिंकून देण्याची ऑफर”
शरद पवार यांच्या विधानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, “काल शरद पवारांनी सांगितलं की, निवडणुकीपूर्वी काही लोक त्यांना भेटले. त्यांनी १६० जागा जिंकवून देण्याचं आश्वासन दिलं आणि बदल्यात विशिष्ट रक्कम मागितली. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, हेच लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले होते. या लोकांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात आम्हाला भेटून म्हटलं की, ज्या ६० ते ६५ जागा तुम्हाला कठीण वाटत आहेत, त्या सांगा. आम्ही EVM च्या माध्यमातून त्या जागांवर तुम्हाला विजय मिळवून देऊ. मात्र, आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, आम्हाला अशा पद्धतीची मदत नको."
पुढे राऊत म्हणाले की, "आमचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगलं यश मिळवलं आणि आम्हाला विश्वास होता की विधानसभा निवडणुकीतही जनतेचा पाठिंबा मिळेल. मात्र, त्यांनी आग्रहाने सांगितलं की, सत्ताधारी पक्ष EVM आणि मतदार याद्यांमध्ये फेरफार करून विजय मिळवत आहेत. त्यामुळे तुम्ही मागे पडाल, हे आम्हाला दिसतंय. आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तरीही आम्ही त्यांचं ऐकलं नाही, कारण आमचा विश्वास लोकशाही व्यवस्थेवर आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ज्या लोकांनी भेट घेतली, त्यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य असावं, असं आता वाटतं.
शरद पवार काय म्हणाले होते?
गुरुवारी शरद पवारांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत एक धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितलं, “विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन अनोळखी व्यक्ती मला भेटायला आल्या. त्यांनी २८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली. मात्र, त्या बदल्यात त्यांनी काही रक्कम मागितली. त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल कोणतीही शंका नव्हती. म्हणून मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर मी या व्यक्तींची राहुल गांधी यांच्याशीही भेट घालून दिली. त्यांनीही लोकशाहीवरील विश्वास दाखवत त्यांचं म्हणणं नाकारलं. आम्ही दोघांनीही जनतेसमोर जाऊन मते मागण्याची भूमिका घेतली,” असंही पवारांनी स्पष्ट केलं.
राजकीय वर्तुळात खळबळ
या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या विधानांनी देशाच्या राजकारणात नवा वाद उभा केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य हस्तक्षेप आणि पारदर्शकतेच्या प्रश्नावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.