ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : अजित पवारांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र हादरला; उद्धव ठाकरे यांची भावनिक श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे अपघाती अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे अपघाती अकाली निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केलं जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलं. “एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय, अभ्यासू आणि आपल्या खात्यावर वचक ठेवणारे नेते होते. विशेषतः अर्थ विभागाचा सखोल अभ्यास असलेला नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रशासनावर पकड, निर्णयक्षमता आणि कामातील स्पष्टता ही त्यांची बलस्थाने होती. एक सहकारी म्हणून आमचं विशेष नातं जुळलं होतं, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकार्याची आठवण करून दिली.

राजकारणात वेगवेगळे मार्ग स्वीकारले गेले असले तरी अजित पवार यांनी कधीही वैयक्तिक संबंध तोडले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते दिलखुलास स्वभावाचे होते. मनात येईल ते स्पष्टपणे बोलायचे, मात्र द्वेष मनात न ठेवणारे नेते होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले, मात्र त्यांचा रोख कायम कामावर असायचा.

‘दादा’ म्हणून अजित पवार हे महाराष्ट्रभर लोकप्रिय होते. कार्यकर्त्यांना जपणारा, त्यांच्याशी थेट संवाद साधणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम उभे राहत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

“ते सर्वार्थाने ‘दादा’ होते,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. ठाकरे आणि शिवसेना परिवारातर्फे पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पष्टवक्ते, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा