(Maharashtra Weather News) उत्तर भारतात वाढलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव आता महाराष्ट्रासह मध्य भारतातही जाणवू लागला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार
राज्यातील थंडी हळूहळू चिवट बनत असून, किमान तापमानात पुन्हा एकदा घसरण दिसू लागली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आगामी 48 तासांत पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागांत तापमान 3 ते 4 अंशांनी खाली येऊ शकतं. काही ठिकाणी पारा 7–8 अंशांपर्यंत घसरू शकतो, त्यामुळे राज्यावर अधिक तीव्र थंडीचं सावट राहण्याची शक्यता आहे.
नाशिक महाबळेश्वरपेक्षा थंड
मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात गारठा स्पष्ट जाणवला. नाशिकमध्ये मंगळवारी किमान तापमान 10.3 अंश नोंदवलं गेले, तर महाबळेश्वरमध्ये ते 12 अंश होतं. त्यामुळे नाशिकने महाबळेश्वरलाही मागे टाकत अधिक थंड ठिकाण म्हणून नोंद केली.
साताऱ्यातही पुन्हा थंडीचा शिरकाव
सातारा जिल्ह्यात तापमान पुन्हा घसरत असून पारा 13 अंशांवर स्थिरावला आहे. सकाळी फिरण्यासाठी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांना स्वेटर, शॉल आणि उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय. काही दिवस कमी झालेली थंडी मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढू लागली आहे. वाई आणि पाचगणी परिसरात धुकं आणि गारवा कायम राहिल्यानं पर्यटकांची संख्या देखील वाढताना दिसते.
जळगाव जिल्ह्यात गारठा वाढतच
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत थंडीने जोर पकडला आहे. जामनेर तालुक्यातील तोंडापूर आणि परिसरात सकाळ-संध्याकाळ तीव्र गारठा जाणवतोय. अजिंठा डोंगररांगामध्ये प्रत्येक दिवसागणिक थंडी वाढत असून धुक्याचं सुंदर दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे.
थोडक्यात
उत्तर भारतात वाढलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव आता महाराष्ट्रासह मध्य भारतातही जाणवू लागला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,
राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.