थंडीचे दिवस सुरू झाले की लहानपणी क्रिडा स्पर्धांचे वेध लागयचे. तुम्हीही तुमच्या बालपणी शाळेत असताना खो-खो हा खेळ खेळला असालच. शालेय खेळ म्हणून ख्याती असणारा खो-खो या खेळाची कधी विश्वचषक स्पर्धा होईल असं तुम्हाला जर कोणी सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. मात्र, खो-खो खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा सध्या भारतात सुरु आहे. राजधानी दिल्लीमध्ये १३ ते १९ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुष विभागामध्ये २० देशातील संघ, तर महिला विभागात १९ देशातील संघ मैदानात उतरले आहेत.
भारताच्या पुरुष आणि महिला संघाची तुफान कामगिरी
पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुरुष आणि महिला संघ तुफान कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. प्रतीक वायकर आणि प्रियांका इंगळे यांच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या मातीतल्या या खेळाचे पहिले विश्वविजेतेपद मिळवण्याची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आहे. क्रिडाप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरणारे प्रियांका इंगळे आणि प्रतिक वाईकर हे दोघे महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडू आहेत. दोघेही सध्या फॉर्ममध्ये असून भारताला यश मिळवून देतील यात शंका नाही.
कोण आहे प्रियंका इंगळे?
भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे महाराष्ट्राची कन्या आहे. बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 2023 मध्ये चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकलं. यापूर्वी 2022 मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कारही मिळाला आहे. तिने आपल्या 15 वर्षांच्या खो-खो कारकिर्दीत 23 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
कोण आहे प्रतीक वायकर?
भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकरचे खो-खो या खेळाशी विशेष नातं आहे. प्रतिकने अवघ्या आठ वर्षांचा असताना खो-खो खेळायला सुरुवात केली. प्रतीकने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याचं योगदान आहे. प्रतीक हा उच्चशिक्षित आहे. प्रतीकला केवळ खेळाची आवड नसून त्याच्याकडे फायनान्स आणि कॉम्प्युटर सायन्सची या दोन्ही विषयातील पदवी आहे. प्रतीकला क्रीडा कोट्यातून नोकरी मिळालेली आहे.
खो-खो खेळाचा इतिहास
उपलब्ध माहितीनुसार खो-खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या मातीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली असल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात. अर्जुन पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी), जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी) दिले जातात.