रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंट हा ग्राहक आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. ग्राहक प्रकल्पाची प्राथमिक माहिती बहुतेक वेळा एजंटकडूनच मिळवतो. मात्र, नोंदणी नसलेल्या किंवा निकष पूर्ण न करणाऱ्या एजंट्सकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) ठाणे जिल्ह्यातील तब्बल 4,303 एजंट्सची नोंदणी रद्द केली आहे.
महारेराकडे राज्यभरात सुमारे 50 हजारांहून अधिक एजंट्सची नोंदणी आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 6,760 नोंदणीकृत एजंट कार्यरत असून यामधील अनेकांनी रेरा कायद्यानुसार आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा त्यांनी नूतनीकरण प्रक्रियेत भाग घेतलेला नाही. त्यामुळे या एजंट्सची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
रेरा कायद्यांतर्गत एजंटसाठी विविध तरतुदी असून, त्यात आदर्श विक्री करार, नोंदणी पत्र, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी यांची योग्य माहिती ग्राहकाला देणे अपेक्षित असते. ही माहिती देताना स्पष्टता आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे. ग्राहकांनी घर खरेदीचा निर्णय घेताना या माहितीचा आधार घेत असल्याने एजंटचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महारेराने सर्व एजंट्सना अधिकृत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी आणि प्रकल्पांची पारदर्शकता टिकवण्यासाठी अशा एजंट्सवर कारवाई केली जात आहे. महारेराच्या या निर्णयामुळे एजंट क्षेत्रात शिस्त आणि प्रामाणिकपणा आणण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.