प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
रणवीर अनेकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतो. त्याचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. अनेकदा त्याला ट्रॉलिंगलादेखील समोरे जावे. मात्र यावेळी त्याने शोमधील एका महिलेला आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
या सगळ्या प्रकरणामध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणवीरच्या विधानाबाबत नारजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना रणवीरच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "त्याने केलेले विधान हे अत्यंत फालतू आणि वाईट आहे. मी त्याचं विधान ऐकले नाही मात्र याबद्दल माझ्या कानावर आले आहे. अनेक गोष्टी अश्लीलपणे चालवल्या जात असल्याचेही समजले आहे".
पुढे ते म्हणाले की, "सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो तेव्हा आपलंही स्वातंत्र्य धोक्यात येते. प्रत्येकाने आपल्या मर्यादेचे पालन करावे. अश्लीलतेसाठी काही नियमदेखील आखण्यात आले आहेत. मात्र जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल" असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहबादियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून मुंबई पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.