ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल - जयंत पाटील

राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

मिनाक्षी म्हात्रे, मुंबई

राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीतून दिला.

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही माध्यम प्रतिनिधींना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यकर्त्यांवर हल्लाबोल करताना पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका - एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे असे काही लोकांना वाटते त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू केले आहे असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल... कमी कशी होईल यासाठी प्रयत्न होत आहे. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोकं भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात, त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत असाही आरोप जयंत पाटील यांनी केले. गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाही. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात. हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल काहीही बोलतात त्याबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्विट नव्हे. हे किती धादांत खोटे आहे. हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्विट त्यांचे नाही. ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही ? ज्या दिवशी ट्विट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही त्यामुळे आमचे मुख्यमंत्री त्यांना शरण गेले आहेत का ? असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपला महामोर्चात मिळेल. राज्यभरातून तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे अशा मुंबईच्या जवळ असलेल्या भागातील लोकं लाखो संख्येने येणार आहेत. महाराष्ट्र प्रेमी संपूर्ण ताकदीने मोर्चात उतरणार आहे. महामोर्चाची गर्दी पाहून नक्कीच राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरेल. हे सरकार भित्रे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकार का घेत नाही ? सरकारला कसली भीती आहे ? असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

विकासाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. हे आमदार मॅनेज करणारे सरकार आहे. जनतेशी यांना काही देणे घेणे नाही. कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमा वाद काढला जात आहे. सुप्रीम कोर्टात केंद्रसरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातलीच आहे. ती महाराष्ट्राच्या हिताची भूमिका नाही. निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत हा वाद असाच ठेवणार असेही जयंत पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बऱ्याच वर्षानंतर राजसोबत व्यासपीठावर भेट - उद्धव ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक