Mahavitaran Jobs : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) जवळपास 5,500 विद्युत सहायकांची भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड यादी जाहीर केली आहे. लवकरच हे सर्व कर्मचारी कामावर रुजू होणार असून, यामुळे शाखा कार्यालयांचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी व्यक्त केला. वीज ग्राहकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा देणे हे महावितरणचे आद्य कर्तव्य आहे, असे सांगत त्यांनी वीज वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि कार्यक्षमतेवर भर दिला.
राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (1 ऑगस्ट) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित सत्कार समारंभ व तांत्रिक कामगार कार्यशाळेचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, "महावितरण हे यंत्रणा नव्हे, तर ही एक सेवा आहे. या सेवेचा केंद्रबिंदू म्हणजे वीज ग्राहक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आमचे अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी वीज ग्राहकांसाठी नवे मापदंड निर्माण करत आहेत. हेच कार्य पुढे चालू ठेवत, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, तत्परतेने वीजजोडणी, ग्राहकांच्या तक्रारींवर वेळेत तोडगा आणि वीजबिलांची १०० टक्के वसुली यावर भर द्यावा."
संचालक पवार यांनी आपल्या सेवापथाचा आढावा घेतला. “माझ्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात मी १६ वर्षे शाखा अभियंता म्हणून काम केले. त्यामुळे तांत्रिक कर्मचारी माझ्या हृदयाजवळ आहेत. महावितरण ही संस्था या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर उभी आहे. शाखा कार्यालये, उपकेंद्रे स्वच्छ व आकर्षक ठेवा, यामुळे आयएसओ मानांकन मिळवता येईल,” असे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका
कार्यशाळेदरम्यान तांत्रिक कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील मांडण्यात आल्या. या समस्यांवर पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत सांगितले, “प्रशासन तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहे. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यात आली असून, स्थानिक प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले जातील. सर्व कर्मचाऱ्यांचे समाधान व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते. सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी राजेंद्र पवार यांचा सत्कार करताना सांगितले, "शाखा अभियंता ते मानव संसाधन संचालक हा प्रवास करत असताना पवार यांनी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार केला. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले."