नागपुरात हिवाळी अधिवेशानचं सूप वाजलं आहे. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल माहिती दिली. तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले अजित पवार नाराज अशा बातम्या लावू नये. फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. फडणवीस यांच्या या विधानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हसू आवरतं घ्यावं लागलं.
हिवाळी अधिवेशनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा मांडला. हे अधिवेशन पुरवणी मागण्याचं अधिवेशन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. १७ विधेयकं चर्चा करून मंजूर करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे. तसेच अर्बन नक्षलवाद आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनसंबंधी विधेयकाबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. संयुक्त चिकित्सा समितीकडे संबंधित विधेयक पाठवण्यात आलं आहे. यासंबंधी सर्वपक्षीय २१ जणांची समिती गठित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी १४०० कोटींचा निधी दिल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
खातेवाटप कधी होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पण खातेवाटप नेमकं कुठे रखडलं? आणि खातेवाटप कधी होणार? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. खातेवाटप लवकरच जाहीर होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज रात्री म्हणजेच शनिवारी रात्री किंवा उद्या सकाळी म्हणजेच रविवारी सकाळी खाते वाटप जाहीर होणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. दरम्यान, आता खातेवाटपामध्ये कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं देण्यात येतं? आणि कोणते खाते महायुतीतील कोणत्या पक्षाकडे जाते? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-