मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असून सर्वच पक्ष जोरदार प्रचारात गुंतले आहेत. मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि महायुतीने आपला वचननामा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आला.
या वचननाम्यात महिलांसाठी विशेष योजना, तसेच रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अनेक सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकल प्रवाशांसाठी अधिक डबे वाढवणे, एसी लोकल असूनही तिकीट दर न वाढवणे, शहरात जलवाहतूक सुरू करणे आणि जेट्टी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मेट्रो, रेल्वे, बसप्रमाणेच आता एकाच तिकिटावर वॉटर टॅक्सीतून प्रवास करता येणार असल्याने चाकरमान्यांचा वेळ वाचेल, असा दावा करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मजबूत सिमेंट रस्त्यांवर भर देण्यात येणार आहे.
मराठी माणसाचा मुद्दा लक्षात घेऊनही काही निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. पुनर्विकासाला गती देणे, पाणीपट्टी वाढ थांबवणे आणि प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात उतरवू, असे आश्वासन महायुतीने दिले आहे.