रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे.
महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरे यांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्याने आता वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली. महेंद्र थोरवे म्हणाले की, आजचं अकलूज कुठंय? सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठंय.. तर तो सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आमच्याशी राजकारण कराल, तर लक्षात ठेवा.
कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्यावेळेला पुढच्या वेळेला भरतशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन लोकसभा लढायची तयारी आम्ही ठेवू. मग तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की, ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार होता आलं यापुढे ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी. असे महेंद्र थोरवे म्हणाले.