संगीतविश्वात आपला ठसा उमठवलेल्या लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी आता राजकारणातही पाऊल टाकले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या उमेदवार यादीत त्यांना अलिनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, त्या लवकरच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.
विशेष म्हणजे, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. भाजपच्या या यादीत एकूण १२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये मैथिली ठाकूर यांचं नाव ठळकपणे झळकत आहे.
मैथिली ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपने विद्यमान आमदार मिश्री लाल यादव यांना डावलले आहे. यामुळे नाराज झालेल्या यादव यांनी भाजपचा राजीनामा दिला असून, ते सध्या VIP पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून चाललेल्या चर्चांना अखेर यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
या यादीत केवळ मैथिली ठाकूरच नव्हे, तर माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांना बक्सर मतदारसंघातून संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपची ही यादी अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा समन्वय साधणारी ठरत आहे.
मैथिली ठाकूर यांचा जन्म 25 जुलै 2000 रोजी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झाला. त्यांनी बालपणापासूनच संगीताचे धडे वडील रमेश ठाकूर यांच्याकडून घेतले. त्यांच्या आईचे नाव पूजा ठाकूर असून, त्यांचे दोन भाऊ ऋषभ आणि अयाची ठाकूर आहेत. आज मैथिली ठाकूर केवळ गायिका म्हणून नव्हे, तर एक सोशल मीडिया आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. त्यांच्या इंस्टाग्रामवर 6.3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असून, त्यांनी पारंपरिक भारतीय संगीत लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली आहे.
संगीताच्या मैफिलीनंतर आता मैथिली ठाकूर राजकारणाच्या व्यासपीठावर आपला नवा सूर छेडणार आहेत. अलिनगरमधील मतदारांसाठी हा निर्णय किती प्रभावी ठरेल, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, इतक्या कमी वेळेत पक्षाकडून उमेदवारी मिळणं ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे, यात शंका नाही.