टपाल खात्याची अत्यंत लोकप्रिय आणि खात्रीशीर समजली जाणारी ‘रजिस्टर्ड एडी’ (Registered AD) सेवा येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून बंद होणार आहे. टपाल विभागाने यासंदर्भात अधिकृत सूचना जारी केली असून, याऐवजी ग्राहकांना ‘स्पीड पोस्ट’ सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे टपाल खात्याचे म्हणणे आहे.
खात्रीशीर अन् लोकप्रिय होती 'ही' सेवा
टपाल खात्याच्या काही पारंपरिक व विश्वासार्ह सेवांमध्ये 'रजिस्टर्ड टपाल' सेवेचा समावेश होता. आंतरदेशीय पत्रे, पोस्टकार्डसारख्या इतर सेवा कालांतराने मागे पडल्या असल्या तरी, 'रजिस्टर्ड एडी' सेवा आजही अनेक सरकारी व खासगी संस्थांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या सेवेच्या माध्यमातून पत्र पाठविल्यानंतर त्याची पावती (AD स्लिप) मिळते, तसेच प्राप्तकर्त्याच्या सहीसह टपाल पोहोचल्याची खात्रीही मिळते. त्यामुळे ही सेवा विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
171 वर्षांचा इतिहास संपणार
ब्रिटिश कालखंडात सुरू झालेली ही सेवा सुमारे 171 वर्षांपासून अखंडपणे सुरू होती. मात्र आता, टपाल विभागाने कोणतेही ठोस कारण न देता, ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना पर्याय म्हणून स्पीड पोस्टचा उपयोग सुचवण्यात आला आहे, जो जलद आणि ट्रॅकिंग-सक्षम आहे.
30 ऑगस्टपासून प्रत्यक्षात बंद
'रजिस्टर्ड टपाल' सेवा 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, 31 ऑगस्ट हा रविवार असल्याने, 30 ऑगस्टपासूनच ही सेवा प्रत्यक्षात बंद होणार आहे. टपाल विभागाने स्पष्ट केले आहे की, स्पीड पोस्टच्या माध्यमातून आता टपाल अधिक वेगाने पोहोचवले जाईल आणि ग्राहकांना ऑनलाइन ट्रॅकिंग सुविधाही मिळेल.